Sameer Panditrao
साधारणपणे विमान अपघात चौकशी विभाग भारतीय हवाई क्षेत्रातील विमानांच्या सुरक्षेबाबतच्या घटनांचे अपघात, गंभीर घटना, सामान्य घटना या तीन ढोबळ प्रकारामध्ये वर्गीकरण करतो.
‘एएआयबी’ प्रवासी आणि मालवाहतूक विमानांचे अपघात किंवा त्या संबंधित गंभीर घटनांची चौकशी करतो.
सन २०१७ विमान (अपघात आणि घटनांची चौकशी) नियमांतील नियम तीननुसार, ‘एएआयबी’ चौकशीचे एकमेव उद्दिष्ट अपघात व घटना टाळणे हे असून, जबाबदारी ठरवणे नाही.
घटनेची माहिती मिळताच हा विभाग चौकशी अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवतो. त्यांच्या वेबसाइटनुसार, प्राथमिक चौकशीचा मुख्य उद्देश नाशवंत पुरावे जमा करणे आणि ते सुस्थितीत ठेवणे असतो.
चौकशी समिती गोळा केलेल्या सर्व पुराव्यांचा अभ्यास करून, कोणत्या सखोल तपासण्या आवश्यक आहेत याचा अंदाज घेते.
ऑपरेटर, नियामक, संबंधित कर्मचारी किंवा इतर संबंधित पक्षांकडून गोळा केलेले दस्तावेज व नोंदी तपासल्या जातात व त्यांचे विश्लेषण केले जाते.
‘एएआयबी’ला कोणत्याही न्यायिक संस्थेची किंवा इतर सरकारी प्राधिकरणांची पूर्वपरवानगी न घेता संबंधित पुराव्यांवर अटीविरहित प्रवेश मिळवण्याचा अधिकार दिला आहे.
तपास पूर्ण झाल्यानंतर अहवाल केला जातो. तो अहवाल ‘एएआयबी’चे महासंचालक स्वीकारतात.
पुढील सल्लामसलत आणि पुनरावलोकनानंतर अंतिम अहवाल सार्वजनिक केला जातो आणि अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केला जातो.