Sameer Amunekar
कोकण म्हणजे निसर्गाचं लेणं. समुद्रकिनारे, हिरवीगार डोंगररांग, गड-किल्ले, नद्या आणि धबधब्यांनी नटलेलं हे निसर्गरम्य भूमी आजही पर्यटकांना नव्याने मोहवतंय.
अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेभववाडी तालुक्यात एक नवा पर्यटक केंद्रबिंदू ठरत आहे – नापणे धबधब्यावर बांधलेला महाराष्ट्रातील पहिलाच ‘काचेचा पूल’!
वैभववाडी तालुक्यातील नापणे गावाजवळ असलेला हा धबधबा पर्यटनस्थळ म्हणून आधीच प्रसिध्द आहे. पावसाळ्यात उंचावरून वाहणारा हा धबधबा डोंगरदऱ्यांमधून झेप घेताना अप्रतिम दृश्य साकारतो.
धबधब्याच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घातली आहे ती, या धबधब्यावर बांधलेल्या 'ग्लास ब्रिज' ने.
पूल पूर्णतः मजबूत काचांनी बनवण्यात आला आहे. पारदर्शक काचांमुळे पायाखाली वाहणाऱ्या खोल दरीचा थरार पर्यटकांना रोमांचित करतो.
पूलावरून चालताना वाटते जणू आपण हवेत चालत आहोत. फोटो, व्हिडिओसाठीही ही जागा आता हॉटस्पॉट ठरत आहे.
कोकणातील पर्यटन हळूहळू फक्त समुद्रकिनाऱ्यांपुरतं मर्यादित न राहता आता डोंगर-दऱ्यांमध्येही पसरत आहे. नापणे येथील हा धबधबा आणि काचेचा पूल हे याचं उत्तम उदाहरण ठरत आहे.