Akshata Chhatre
सध्या मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीच्या स्क्रीनवर वाढलेला वेळ घालवण्यामुळे डोळ्यांवर खूप ताण येतो, दृष्टी कमजोर होते आणि लवकरच चष्मा लागण्याची वेळ येते.
ही समस्या लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांमध्ये सामान्य झाली आहे. बहुतांश लोक डोळ्यांची काळजी घेण्यासाठी बाह्य उपाय करतात, पण खऱ्या अर्थाने डोळ्यांचं आरोग्य टिकवण्यासाठी आहार सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो.
रोजच्या आहारात काही विशिष्ट सुपरफूड्स समाविष्ट केल्याने डोळ्यांच्या दृष्टीचं संरक्षण होऊ शकतं आणि चष्मा लागण्याचा धोका कमी करता येतो.
गाजरामध्ये मुबलक प्रमाणात बीटा-कॅरोटीन असतं, जे शरीरात व्हिटॅमिन A मध्ये रूपांतरित होऊन रातांधळेपणाचा धोका कमी करतं.
पालकात ल्युटिन आणि झेक्झँथिन सारख्या अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण जास्त असतं, जे सूर्यप्रकाशातील हानिकारक किरणांपासून डोळ्यांचं रक्षण करतात आणि मोतीबिंदू होण्यापासून वाचवतात.
आवळा हा व्हिटॅमिन C चा उत्तम स्रोत असून, तो डोळ्यांचे स्नायू बळकट करतो आणि डोळ्यांचा थकवा कमी करतो. डाळिंब डोळ्यांतील रक्ताभिसरण सुधारून डोळ्यांना अधिक ऑक्सिजन आणि पोषण मिळवून देतं.
नारळ पाणी शरीराला हायड्रेट ठेवतं, त्यामुळे डोळ्यांतील कोरडेपणा कमी होतो आणि थकवा दूर होतो, विशेषतः उन्हाळ्यात हे खूप फायदेशीर ठरतं.