Pranali Kodre
इंग्लंडचा 37 वर्षीय वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने 29 जुलै रोजी अचानक क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.
ब्रॉड इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज म्हणून गणला जातो.
दरम्यान, इंग्लंडचा यशस्वी गोलंदाज ठरलेल्या ब्रॉडच्या कारकिर्दीची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती.
ब्रॉडच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच टी20 वर्ल्डकप 2007 मध्ये डर्बन येथे त्याच्याविरुद्ध भारताचा अष्टपैलू युवराज सिंगने सलग 6 षटकार मारले होते. पण त्यानंतर ब्रॉडने कारकिर्दीत मागे वळून न बघता दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले.
साल 2006 मध्ये ब्रिस्टोल येथे पाकिस्तानविरुद्धच्या टी20 सामन्यातून ब्रॉडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
ब्रॉडने त्याच्या कारकिर्दीत 167 कसोटी सामने खेळले असून 602 विकेटस (29 जुलै 2023 पर्यंत) घेतल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावावर 1 शतक आणि 13 अर्धशतकांसह 3662 धावांचा समावेशही आहे.
ब्रॉडने 121 वनडे सामने खेळले असून यामध्ये त्याने 178 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 529 धावा केल्या आहेत. ब्रॉडने त्याच्या कारकिर्दीत 56 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 65 विकेट्स घेतल्या आहेत.
ब्रॉड जेम्स अँडरसननंतर कसोटी क्रिकेटमध्ये 600 विकेट्स घेणारा इंग्लंडचा दुसराच गोलंदाज आहे. तसेच ऍशेस मालिकेत 150 पेक्षा अधिक विकेट्स घेणारा केवळ तिसरा गोलंदाज आहे.
ब्रॉड कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या जगातील एकूण गोलंदाजांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे, तर एकूण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये 840 पेक्षा अधिक विकेट्ससह सातव्या क्रमांकावर आहे.