Pranali Kodre
25 डिसेंबर 1984 रोजी जन्म झालेला इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू ऍलिस्टर कूकने व्यावसायिक क्रिकेटमधून याचवर्षी ऑक्टोबरमध्ये निवृत्तीची घोषणा केली.
39 वर्षीय कूक अखेरचा सामना काउंटी क्रिकेटमध्ये सप्टेंबर 2023 मध्ये एसेक्सकडून खेळला.
कूकने 2018 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण तो देशांतर्गत क्रिकेट खेळत होता.
मात्र, आता त्याने व्यावसायिक क्रिकेटला अलविदा म्हणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने 2003 मध्ये एसेक्सकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
साल 2003 पासून कूकने मोठे यश मिळवले असून तो इंग्लंडच्या सर्वात यशस्वी फलंदाजांमध्ये गणला जातो.
त्याने त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीत 352 सामने खेळताना 74 शतके आणि 125 अर्धशतकांसह 46.41 च्या सरासरीने 26643 धावा केल्या.
कूकने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 161 कसोटीत 45.35 च्या सरासरीने 12472 धावा केल्या आहेत. तो इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी धावा करणारा फलंदाज आहे.
विशेष म्हणजे कूकने त्याच्या 161 कसोटी सामन्यांमधील 159 सामने सलग खेळले आहेत. तो 11 मे 2006 पासून ते 7 सप्टेंबर 2018 पर्यंत इंग्लंडने खेळलेल्या सर्व 159 कसोटी सामन्यांत खेळला.
कूकने त्याच्या लिस्ट ए क्रिकेट कारकिर्दीत 178 सामने खेळताना 13 शतकांसह 6510 धावा केल्या, तर टी20 क्रिकेटमध्ये 32 सामन्यांत 1 शतकासह 892 धावा केल्या.