Manish Jadhav
छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल यांच्यातील संघर्ष हा एक मोठा आणि महत्त्वाचा अध्याय आहे. महाराजांनी मुघलांच्या बलाढ्य सत्तेला आव्हान देत महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन केले.
त्यांनी शाहिस्तेखानावर छापा, सुरतेची लूट आणि गनिमी काव्याचा वापर करुन मुघलांना वेळोवेळी पराभूत केले.
औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान याने पुणे येथील लाल महालात तळ ठोकला होता. शिवाजी महाराजांनी रात्रीच्या वेळी अचानक छापा टाकून शाहिस्तेखानाची बोटे कापली आणि त्याचा पराभव केला. हा मुघलांसाठी एक मोठा धक्का होता.
मुघलांच्या ताब्यात असलेल्या सुरत शहरावर शिवाजी महाराजांनी अचानक हल्ला करुन प्रचंड संपत्ती लुटली. यामुळे मुघल साम्राज्याची आर्थिक सत्ता आणि प्रतिष्ठा यांना मोठा धक्का बसला.
औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंग यांना पाठवून शिवाजी महाराजांवर दबाव आणला. जयसिंग यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. या दबावामुळे महाराजांना 23 किल्ले आणि 4 लाख होन मुघलांना द्यावे लागले. हा महाराजांसाठी एक मोठा राजकीय निर्णय होता.
मिर्झाराजे जयसिंग यांच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवाजी महाराज आग्रा येथे औरंगजेबाच्या भेटीला गेले, पण त्यांना कैद करण्यात आले. मात्र, महाराजांनी आपल्या बुद्धिमत्तेने आणि धाडसाने मोठ्या शिताफीने आग्र्याहून सुटका करुन घेतली.
पुरंदरच्या तहात गेलेला कोंढाणा किल्ला परत मिळवण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली. यात तानाजींना वीरमरण आले. महाराजांनी "गड आला, पण सिंह गेला" असे उद्गार काढून कोंढाण्याचा जयघोष केला.
मुघलांनी पुन्हा सुरत शहरात व्यापार सुरु केल्यावर महाराजांनी पुन्हा एकदा सुरत शहरावर हल्ला करुन प्रचंड संपत्ती मिळवली. यामुळे मुघल आणि इंग्रज यांना मोठा धक्का बसला.