Akshata Chhatre
प्रत्येक आईबाबांची इच्छा असते की त्यांचे मूल अभ्यासात लक्ष देऊन प्रगती करावी. पण त्यासाठी केवळ अभ्यासाचे तासच नव्हे तर योग्य वेळेची निवडही महत्त्वाची असते.
काही मुलांना पहाटेचा अभ्यास चांगला वाटतो तर काहींना रात्रीची शांत वेळ अधिक सोयीची वाटते.
यामागे आपल्या शरीराचे नैसर्गिक घड्याळ ‘बॉडी क्लॉक’ काम करत असते, जे ठरवतं की मेंदू कोणत्या वेळेस सर्वाधिक सक्रिय असतो.
सकाळी झोपून उठल्यानंतर शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने असतात, त्यामुळे लक्ष केंद्रित करणे आणि नवीन गोष्टी लक्षात ठेवणे सोपे जाते.
यामुळे गणित, विज्ञान किंवा भाषा यांसारख्या विषयांसाठी सकाळची वेळ अधिक चांगली ठरते.
दुसरीकडे, काही मुलांना रात्री अभ्यास करणे जास्त सोयीचे वाटते. रात्रीचा काळ शांत असतो, त्यामुळे व्यत्यय कमी होतो आणि विचारांमध्ये सुस्पष्टता येते, विशेषतः लेखन आणि सर्जनशील विषयांसाठी.
मेंदू ठराविक वेळेला अभ्यासासाठी तयार होतो, जर तो वेळ रोजचा ठरलेला असेल. म्हणून सकाळ असो वा रात्र, मुलांनी नियमित वेळ ठरवून अभ्यास करणे, वेळेवर झोप घेणे आणि दिनचर्येत शिस्त पाळणे ही सर्वात योग्य पद्धत ठरते.