Akshata Chhatre
नात्यात भांडणं होणं ही काही नवीन गोष्ट नाही. मित्र, कुटुंब, सहकारी, प्रियकर-प्रेयसी किंवा नवरा-बायको कोणत्याही नात्यात कधी ना कधी तणाव निर्माण होतोच.
पण जेव्हा तणाव सांभाळला जात नाही, तेव्हा छोटं कारण मोठं होतं आणि भांडण वाढतं. मग महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो आधी सॉरी कोण म्हणणार?
दोन्ही बाजू आपल्या अहंकारात अडकून बसतात. नात्यापेक्षा इगो मोठा होतो, आणि त्यातून महिनोन्महिने चालणारा अबोला सुरू होतो.
दुराव्याचं हेच खरं कारण आहे. पण जर एक गोष्ट लक्षात घेतली की आपल्या अहंकारापेक्षा नातं महत्त्वाचं आहे तर तोडगा काढणं सोपं होतं.
भांडणानंतर भावना तीव्र असतात; राग, दुःख, अपमान, असहाय्यता. अशा वेळी लोक समोरच्याला चुकीचं सिद्ध करण्यावर भर देतात.
पण जेव्हा मन शांत होतं, तेव्हा दोघेही एकमेकांकडून आधी बोलण्याची अपेक्षा करतात, आणि संवाद पूर्ण थांबतो.
कोणतंही नातं मजबूत ठेवण्यासाठी संवाद गरजेचा आहे. भांडणानंतर पहिले पाऊल उचलणं ही कमजोरी नसून भावनिक परिपक्वतेचं लक्षण आहे.