Manish Jadhav
रत्नागिरीतील आरे-वारे हे जुळे किनारे आपल्या निळ्याशार पाण्यासाठी आणि निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्यांचा अनुभव देणारे हे कोकणातील दुर्मिळ ठिकाण आहे.
गोव्याच्या किनाऱ्यांची आठवण करुन देणारे या किनाऱ्याचे पाणी अतिशय स्वच्छ आणि पारदर्शक आहे. पांढरी वाळू आणि निळा समुद्र यामुळे या ठिकाणाला कोकणची 'ब्लू लगून' असेही म्हटले जाते.
किनाऱ्याकडे जाताना घाटात एक सुंदर व्ह्यू पॉइंट लागतो. येथून दिसणारा अथांग अरबी समुद्र आणि वळणावळणाचा रस्ता हे दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते.
गणपतीपुळे जवळ असूनही आरे-वारे किनारे पर्यटकांच्या गजबजाटापासून बरेच दूर आहेत. ज्यांना शांततेत समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकायचा आहे, त्यांच्यासाठी हे 'परफेक्ट डेस्टिनेशन' आहे.
सूर्यास्ताच्या वेळी येथील आकाश केशरी-गुलाबी रंगाने न्हाऊन निघते. समुद्राच्या लाटांवर पडणारे मावळत्या सूर्याचे प्रतिबिंब पाहणे हा एक डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव असतो.
या किनाऱ्यावर बारीक पांढरी वाळू पसरलेली आहे, तर किनाऱ्याच्या कडेला असलेल्या सुरुच्या झाडांमुळे या ठिकाणचे सौंदर्य अधिकच खुलते. दुपारच्या वेळी या झाडांच्या सावलीत बसून समुद्राचा आनंद घेता येतो.
रत्नागिरी ते गणपतीपुळे या मार्गावरील 'आरे-वारे कोस्टल रोड' हा भारतातील सर्वात सुंदर रस्त्यांपैकी एक मानला जातो. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र अशा प्रवासाचा आनंद प्रवाशांना मंत्रमुग्ध करतो.